शब्दांकन: रश्मी मुसळे-साळगांवकर

पालकत्व हे एक भलंमोठं शिवधनुष्यच आहे या माझ्या मताशी तुम्ही सहमत असालच. मूल नेमकं कसं शिकतं, त्याच्या शिक्षणात पालकांनी साथ दिली तर काय सकारात्मक परिमाण होतात ही  प्रक्रिया जर का पालकांना समजून घेता आली तर हे पालकरूपी शिवधनुष्य पेलायला बळही येईल आणि त्यातला आनंदही घेता येईल, नाही का? आज मी तुम्हाला अशाच एका पालकाची ओळख करून देणार आहे. साधना ही गेल्या काही वर्षांपासून बालशिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांमधे काम करत आहे. हे काम करताना तिला बालशिक्षणाविषयीचे अनेक बारकावे लक्षात येऊ लागले. तिने या सर्वाचा उपयोग आपल्या मुलासाठी करून घेतला नसता तर नवलच. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बालशिक्षणाशी निगडीत कोणकोणत्या बाबींचा कसा, कधी, कुठे वापर करायचा याची साधनाने मग रीतसर योजना आखली व त्यानुसार पावलं टाकायला सुरूवात केली. त्यातलंच एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे आपल्या मुलाला – अनघला तिने करून दिलेली वाचन संस्कृतीची ओळख.

साधना आणि आप्पा यांचा मुलगा अनघ आता ४ वर्षांचा आहे. साधनाने त्याला वयाच्या सव्वा वर्षापासूनच पुस्तकांच विश्व खुलं करून दिलं. चित्रांच्या माध्यमातून मुलांची कल्पनाशक्ती व निरीक्षणशक्ती यांचा विकास व्हायला मदत होते ते ती जाणून होती. म्हणूनच तिने सुरूवात केली ती अशा पुस्तकांपासून ज्यांमधे मोठ्या आकारातली भरपूर चित्रे आहेत, मजकूर कमी आहे, तसेच ठराविक शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे जसे की खबडक खबडक, अगडम बगडम इ. अनघला पुस्तकांच्या जगाची ओळख नीट व्हावी याकरिता सुरुवातीला त्यांनी मराठी भाषेतल्या पुस्तकांवर भर दिला, कारण अनघच्या घरची भाषा ही मराठी होती. पुस्तकातली चित्रं दाखवत त्यातली गोष्ट अनघला वाचून दाखवल्यामुळे गोष्टीतील भावविश्वाशी स्वत:ला एकरूप करून घेणं, संपूर्ण गोष्ट समजणं अनघला अगदी सहज शक्य व्हायचं. अनघ मग दीड-दोन वर्षांचा झाल्यावर हळूहळू साधनाने हिंदी आणि नंतर इंग्रजी भाषेतील पुस्तकं त्याला वाचून दाखवायला सुरुवात केली. 

अशाप्रकारे अवघ्या अडीच वर्षांपासून अनघ तिन्ही भाषांतल्या पुस्तकांच्या सान्निध्यात वाढू लागला. साधना म्हणाली की एवढ्या लहान वयापासून पुस्तकांमधे वावरल्यामुळे अनघला एक गोष्ट तर कळली होती की, पुस्तकांबरोबर आपल्याला मजा येते. त्यामुळे त्या पुस्तकांची आपण काळजी घेतली पाहिजे. नाहीतर आपल्याला त्यांची मजा घेता येणार नाही. याचा परिणाम असा झाला की, इतक्या पुस्तकांमधे वावरत असूनही आजपर्यंत त्याने कधीच कोणतंही पुस्तक फाडलेलं नाही. पण त्याचवेळी साधना हेही आवर्जून सांगतात की, जरी त्याने एखादं पुस्तक फाडलं असतं तरीही मी अनघला पुस्तक का फाडू नयेत हे न रागावता शांतपणे समजावून सांगितलं असतं. एखादी वस्तू निव्वळ लहान मूल ती तोडेल, फोडेल, खराब करेल, फाडेल या भीतीने आपण त्याला ती वस्तू हाताळायला न देण हे म्हणजे त्या लहान मुलाच्या मनात त्या वस्तूबद्दल असलेल्या कुतूहलाला संपवणं असतं आणि कुतूहल संपलं की शिकणंही संपतं. साधनाने अनघला फक्त गोष्टीच वाचून दाखवल्या नाहीत तर त्या गोष्टीतली चित्रं, पात्रं, घटना यांविषयी अनघबरोबर गप्पा मारल्या, काहीही बोलताना पुस्तकांचा संदर्भ घेतला. यातून अनघचं पुस्तकांबरोबरचं नातं फुलू लागलं.  

हळूहळू पुस्तकातील शब्द, वाक्यं, चित्रं यांची अनघला गोडी वाटू लागली. मग तो साधनाकडे तीच तीच पुस्तकं परत परत वाचून दाखवायचा आग्रह धरू लागला. कालांतराने पुस्तक वाचून झाल्यावर तो स्वत: त्या पुस्तकांमधली गोष्ट त्यातल्या चित्रांच्या मदतीने उलगडून सांगू लागला. या सगळ्याचा फायदा त्या बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी होत होता हे साधनाला जाणवत होतं. 

परवा अनघ आमच्या ऑफिसमध्ये आला होता. खेळता खेळता बैलाचा संदर्भ आला आणि तो लगेच बैलाचं गाणं म्हणू लागला. यमक जुळणारे शब्द सांगणं, आपणहून काहीतरी गुणगुणं, पुस्तक आणि वास्तव यांना जोडणं, कल्पना विश्वात रमणं या पुस्तकांमुळे झालेल्या विशेष गोष्टी आम्हाला अनघमध्ये दिसतात. त्याची पुस्तकांची स्वतःची आवड तयार झाली आहे. प्राणी आणि निसर्ग असलेली पुस्तकं त्याला आवडतात. त्याच्या खेळातही या गोष्टी नेहमी दिसतात. छोट्या मांजराच्या पिल्लाला मदत करणाऱ्या महागिरी हत्तीची गोष्ट वाचल्यावर अनघची प्रतिक्रिया होती, “जंगलाचा राजा तर हत्ती असायला हवा. कारण तो ताकदवान असूनही कोणाला मारत नाही, सगळ्यांना मदत करतो”. हे पुस्तक वाचल्यापासून हत्ती हा प्राणी अनघचा हिरो बनला आहे. त्याला जिकडेतिकडे हत्तीच हवा असतो. ‘मामाच्या लग्नात घोडा नको, हत्तीच आणूया’ असा त्याचा आग्रह होता. अनघला ‘यश’च्या पुस्तकांची मालिका खूप भावली होती. त्यातील पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्याच्यावर प्रभाव पडला होता, ती पात्रं जशी वागतात तसंच करण्याचा तोही प्रयत्न करत होता.

पुस्तकांमुळे अनघची शब्दसंपत्ती वाढू लागली. अवघ्या दोन- अडीज वर्षांच्या मुलाच्या रोजच्या बोलण्यातही अनेक समर्पक शब्दांचा वापर योग्य ठिकाणी होऊ लागला. साधना सांगते, “आता अनघ ४ वर्षांचा झाला आहे, पण तरीदेखील त्याला पुस्कांचा कधीही कंटाळा येत नाही. उलट एक संपलं की, दुसरं पुस्तक हातात घेऊन तो तयारच असतो.” सध्या साधनाच्या घरी टीव्ही नाही, पण अनघसाठी कपाट भरून पुस्तकं मात्र आहेत!  

टाटा ट्रस्टच्या ‘पराग’ या कार्यक्रमाअंतर्गत साधनाने Library Educator चा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. “या कोर्समुळे बालसाहित्याचा आवाका वाढण्यासाठी मदत झाली आणि बालसाहित्याचा अनोखा खजिना माझ्यासाठी खुला झाला. अनेक नवीन, वेगळ्या पुस्तकांशी मी जोडले गेले” असं साधना म्हणाली. बालशिक्षण क्षेत्रात काम केल्यामुळे तिला अनघला पुस्तकांच्या जगात नेणं सुकर झालं. याच अनुभवाचा उपयोग सध्या ती ‘बिलीफ’ मध्येही करते आहे. पुस्तकं आणि मुलांबरोबरची तिची सहजता आम्हाला खूप भावते. बालसाहित्याबद्दल तिला विशेष जिव्हाळा आहे. वस्त्यांमधील अंगणवाड्यांपर्यंत बालसाहित्य पोहचवण्यात तिच्या अनुभवाची नक्कीच मदत होईल. 

साधना गुलदगड: Project Officer, BELIEF, Pune

आप्पा बंडगर: Sales Manager, Cherlyin Monta Resort.

संपर्क: sadhana.guldagad@gmail.com

अनघच्या आवडीची पुस्तकं 

पुस्तक  लेखक चित्रकार प्रकाशक 
My Little Teddy Buddy cheryl lee howard Publish America
महागिरी हेमलता  पुलक विश्वास Children’s Book Trust
पाचवी गल्ली माधुरी पुरंदरे माधुरी पुरंदरे ज्योत्सना प्रकाशन
हिरव्यागार पाण्यामध्ये काळ्याशार म्हशी वसीम मणेर वसीम मणेर दवात- ए-दक्कन
ऊ टूची गोष्ट पारंपरिक सुजाता भागवत एकलव्य
आपला जॉन व्हेरोनिक व्हॅन डॅन आबील एमा द वूट ज्योत्सना प्रकाशन
रानी भी बरखा सिरीज
पिलू  की गुल्ली बरखा सिरीज
माकडाचे साहस सर्व शिक्षा अभियान

One Thought on “अनघ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *