शब्दांकन: मुक्ता नावरेकर 

अमेरिकेत अरिझोना मधल्या एका लहान मुलांच्या वस्तुसंग्रहालयात एक २ वर्षांची चिमुकली आई बाबा बरोबर फिरत होती. तिथले वेगवेगळे विभाग बघत, बागडत होती. दिवसभर मस्ती करून दमल्यावर शेवटी ती तिथल्या ‘रिडींग स्पेस’मध्ये जाऊन निवांत पुस्तक वाचत बसली. ती पुस्तकं तिला इतर गोष्टींइतकीच आकर्षक वाटली.  थोडा वेळ शांतपणे पुस्तक वाचून मगच तिथून बाहेर पडली!

निशिगंधा आणि आदित्य याची मुलगी शलाका. नुकतीच ती दोन वर्षांची झाली आहे. साता समुद्रापार राहूनही त्यांनी प्रयत्नपूर्वक तिची मातृभाषेतल्या पुस्तकांशी ओळख करून दिली. त्याबरोबरच इंग्रजी भाषेतली पुस्तकंही आणली. निशिगंधाने शलाकाच्या जन्माच्या आधीपासून तिच्यासाठी पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. त्यात तिच्या कुटुंबातल्या व्यक्तींविषयी तर लिहिलं आहेच, पण शलाकाच्या पहिल्या वर्षातल्या तिच्या वाढीच्या विविध टप्प्यांच्या नोंदी पण करून ठेवल्या आहेत. त्यानुसार तिचे फोटो पण लावले आहेत. शलाका हे स्वतःचं पुस्तक खूप आवडीने वाचते. निशिगंधा म्हणते की ‘शलाका मोठी झाल्यावर तिचं लहानपण तिला पुस्तकातून जगता यावं यासाठी आम्ही हे पुस्तक बनवलं आहे.’ 

निशिगंधाची दुबई मधील मैत्रीण आदिती शाह ‘लर्निंग टाइम्स’ या कंपनीत काम करत होती. तिने शलाका ४ महिन्याची असताना निशिगंधासाठी एक सत्रं घेतलं होतं. त्यात अगदी तान्ह्या बाळाला पुस्तक वाचून दाखवण्याचे काय फायदे होतात, लहान वयात बौद्धिक विकास होण्यासाठी पुस्तकं कशी मदत करतात याविषयी बरीच उपयुक्त माहिती सांगितली होती. ‘या सत्रामुळे खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली आणि माझा उत्साह वाढला असं निशिगंधा आवर्जून सांगते.’ त्यानंतर लगेचच तिने शलाकाला पुस्तकांची ओळख करून द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला तिने पुस्तकांमध्ये विशेष रुची दाखवली नाही. मात्र त्यातली चित्रं बघणं, पानं बदलणं हे तिला आवडायचं. तिच्या पहिल्या ‘फादर्स डे’ला I love you Daddy हे पुस्तक आणलं. तिला आदित्यबरोबर हे पुस्तक वाचायला खूप आवडतं. पुस्तकं वाचताना आदित्य त्यातल्या प्राण्याचे वेगवेगळे आवाज काढून दाखवतो. ते पाहून शलाकाही वेगवेगळे आवाज काढायला शिकली. पुस्तकांप्रमाणेच तिला फ्लॅश कार्ड्स पण फार आवडू लागले. ती दिड वर्षांची असतानाच फ्लॅश कार्ड्स वरची चित्रं ओळखू लागाली, आपण सांगू ते फ्लॅश कार्ड बरोबर आणून देऊ लागली. निशिगंधा आणि आदित्यने शलाकाला पुस्तकं हाताळण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं. शलाकाला पुस्तकं रंगवायला फार आवडतं. रंगीत पेन्सिली घेऊन ती पुस्तकं रंगवत बसते. बाबाच्या डेस्क वरून पेन पळवायचा आणि त्याच्या वहीत काहीतरी खरडायचं हे तिचं आवडीचं काम आहे. 

पुस्तकांमुळे शलाकाच्या विकासामध्ये काय जाणवलं हे विचारल्यावर निशिगंधा म्हणाली की ‘अगदी लहान वयात शलाका पुस्तकातल्या गोष्टी आणि वास्तव यांचा संबंध जोडू लागली. ती दीड वर्षांची असताना आम्ही तिला एका प्राणिसंग्रहालयात नेलं होतं. हत्ती, जिराफ, माकड, सिंह, वाघ, पांडा, मासे हे सगळे प्राणी ती पहिल्यांदाच बघत होती. मात्र पुस्तकांतून तिची या प्राण्यांशी आधीच ओळख झाली होती. हेच प्राणी प्रत्यक्षात बघून ती खूप खुश झाली. सगळे प्राणी तिने अचूक ओळखले. पुस्तक वाचताना ती आमचे हावभाव लक्षपूर्वक बघते. आणि मग तसेच हावभाव तिच्या नेहमीच्या बोलण्यात, वागण्यात पण दिसतात. शलाका अजून सगळे शब्द बोलायला शिकते आहे. पण तिच्या बोलण्यात कुजबुजणं, नाटकी हसणं, नाटकी रडणं, नकला करणं हे सगळे प्रकार असतात!’  शलाकाची एक गोड आठवण सांगताना निशिगंधा म्हणाली, “एकदा शलाका एकटीच काहीतरी बोलत होती. मी कान देऊन ऐकलं तर ती ‘Its ok, you are alright, no crying’ असं म्हणत होती. मी जवळ जाऊन बघितलं तर तिच्या एका पुस्तकावर रडणाऱ्या मुलीचं चित्रं होतं आणि शलाका त्या मुलीला समजावत होती”! पुस्तकातल्या पात्रांविषयी तिची अशी छान जवळीक तयार झाली आहे. दुकानात गेल्यावर पुस्तकांचा विभाग आला की शलाका प्रचंड खुश होते. नवनवीन पुस्तकं हाताळते, पुस्तक विकत घ्या असा आग्रह करते. नवीन पुस्तक घेतल्यावर आपल्या आजी आजोबा आणि नाना नानींना व्हिडीओ करून ती दाखवणं, त्यांच्याविषयी गप्पा मारणं, पुस्तकांमधली चित्रं त्यांना दाखवणं हा शलाकाच्या आवडीचा कार्यक्रम असतो.

अमेरिकेतील वाचन संस्कृतीबद्दल सांगताना निशिगंधा म्हणाली, “इथे पुस्तकांच्या दुकानात ‘रिडींग कॉर्नर्स’ पाहायला मिळतात. तिथे बसून पुस्तकं वाचण्याची सोय असते. इथल्या सार्वजनिक वाचनालयांमध्ये मुबलक प्रमाणात बालसाहित्य उपलब्ध असतं. अगदी लहान वयाच्या मुलांसाठी जाड पुठ्ठयाची पुस्तकं असतात. तान्ह्या बाळांसाठी ‘बाथ बुक्स’ सुद्धा असतात. अंघोळ करताना, तेल लावताना ती पुस्तकं बाळं वाचू शकतात. कोरोना काळात इथल्या एका वाचनालयाने ऑनलाईन गोष्ट सांगण्याची सत्रं सुरु केली. तिथले कर्मचारी पुस्तकातल्या गोष्टी मुलांना वाचून दाखवतात. रेस्टोरंटमध्ये लहान मुलांना कंटाळा येऊ नये म्हणून रंगीत चित्रं असलेले कागद, रंग देतात. शॉपिंग मॉल्स मध्ये लहान मुलांसाठी टेबल खुर्च्या मांडून, पुस्तकं, कागद, रंग ठेवलेले असतात. आई बाबा खरेदी करत असताना मुलं तिथे पुस्तकांसोबत वेळ घालवू शकतात. मी जेव्हा कॅलिफोर्नियामध्ये होते तेव्हा तिथल्या गल्लीत ‘नेबरहूड लायब्ररी’ होती. पुस्तकांच्या देवाण घेवाणीची ती छान व्यवस्था होती. तिथे कोणीही आपल्याकडची पुस्तकं आणून ठेवत, आणि कोणीही कोणतंही पुस्तक वाचायला घेऊन जात. कोणत्याच पुस्तकांची नोंद व्हायची नाही. परस्पर विश्वासावर ही छोटेखानी लायब्ररी चाले.   

शलाकाच्या पुस्तकं हाताळण्याच्या सवयी पण हळूहळू बदलत आहेत. तिने सुरुवातीला पुस्तकं फाडली, चावली सुद्धा! नंतर ती एकटी पुस्तकं हाताळू लागली. पण एका वेळी एकच पुस्तक घेणं तिला मान्य नव्हतं. सगळी पुस्तकं बाहेर काढून जमिनीवर मांडून त्यांच्यामध्ये बसून वाचायला तिला फार आवडायचं. सध्या ती तिच्या छोट्या डेस्कवर बसते आणि पुस्तकांच्या खोक्यातून स्वःताला हवं असलेलं पुस्तक घेते. एक पुस्तक वाचून झालं की ते ठेवून देते आणि दुसरं वाचायला घेते. रात्री झोपताना पुस्तक वाचून झोपायला तिला फार आवडतं. दोन वर्षांच्या बाळाच्या पुस्तकांच्या या विशिष्ट सवयी आणि आवड तयार होणं मला फार भावलं. 

पुस्तकांशी जवळीक झाल्यावर त्यातली कथा हा खूप छोटा भाग होऊन जातो. मुलांना ती कथा पुन्हा पुन्हा ऐकायला, अनुभवायला आवडतं. कथा ऐकताना आपलं भावविश्व बांधायला आवडतं. त्यातली चित्रं, पात्रं त्यांच्याशी गप्पा मारतात. पुस्तकांचा वास, स्पर्श, त्याची बांधणी अशा असंख्य भौतिक घटकांमुळेही एक विलक्षण अनुभव मुलांना मिळत असतो. ते एक भावनिक नातं असतं. पुस्तकाच्या कथेवर बेतलेलं पण कथेच्या फार पुढे गेलेलं. शलाका सारख्या लहानग्यांना हे नातं उमगलेलं असतं.

आदित्य दिवेकर- टेक्निकल प्रोग्रॅम मॅनेजर

निशिगंधा वझे दिवेकर – आहारतज्ञ 

संपर्क:nirava369@gmail.com

शलाकाच्या आवडीची पुस्तकं 

पुस्तक  लेखक  प्रकाशक 
छान छान बडबड गीते जीवनदीप
यश – ५ पुस्तकांची मालिका माधुरी पुरंदरे  ज्योत्स्ना प्रकाशन
छान छान शिशुगीते  जीवनदीप 
राधाचं घर माधुरी पुरंदरे  ज्योत्स्ना प्रकाशन
First १०० Words  Priddy Books  
एकशे सदतिसावा पाय  माधुरी पुरंदरे 
The Rainbow Fish  Marcus Pfister NorthSouth Books
I Love You Daddy Jillian Harker, Kristina Stephenson 
Busy Windows on the farm Silver Dolphin Books
Kids Board Book- Numbers  Manoj Publication 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *