Joy Of Reading Week मध्ये आजचा शेवटचा लेख जन्मेषविषयी.

शब्दांकन – रश्मी मुसळे – साळगांवकर

“तुला काय लागलं हे पायाला? तू गाडी चालवत होतास तर मग तू समोर बघितलं नाहीस का? गाडीला ब्रेक असतो, तो का नाही दाबला तू?” जन्मेषच्या प्रश्नांची गाडी सुसाट धावत असलेली पाहून त्याच्या आजोबांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. दोन अडीच वर्षांचा जन्मेष फारच कमी बोलायचा. आशिष (बाबा) आणि अंजू (आई) यांना शंका वाटायची की, आपण जे त्याच्याशी बोलतोय, त्याला जे सांगतोय ते त्याला कळतंय की नाही? शिवाय तो जे काही थोडे शब्द बोलायचा ते अगदी बोबड्या आणि अस्पष्ट बोलीत बोलायचा. अंजूला असं जाणवत होतं की, जन्मेष आपल्या सगळ्यांना काहीतरी सांगू पाहतोय, पण ते त्याला बोलूनच दाखवता येत नाहीये आणि मग त्यामुळे तो अजूनच चिडचिडा होऊ लागला आहे. या सगळ्या प्रकारामुळे ती चिंतातूर झालेली होती. पण आशिष शिक्षणक्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करत असल्याने त्याला या सगळ्या प्रकाराची भीती नाही वाटली, उलट त्याने अंजूला समजावले की, या वयातली मुले ही बोबडं बोलतात आणि शिवाय काही मुलं लवकर बोलू लागतात तर काही उशीरा. पण तरीही त्या दोघांनी यासंदर्भात स्पीच थेरपिस्टचा सल्ला घ्यायचा ठरवलं. डॉक्टरांनी जन्मेषच्या बोबडं बोलण्याबद्द्ल काळजी करू नका असं सांगितलं. पण त्याचवेळी त्यांनी आशिष व अंजूला काही गोष्टी जन्मेषबरोबर आवर्जून करायला सांगितल्या. त्याच्याबरोबर भरपूर बोलणं, त्याला बोलतं करणं, गाणी म्हणून दाखवणं इ.

आशिष आणि अंजुच्या लक्षात आलं की, जन्मेष लहान मुलांसाठीची गाड्या, प्राणी, भाज्या, फळे, रंग वगैरेंची चित्रं असलेली पुठ्ठ्याची पुस्तकं नेहमीच खूप कुतूहलाने न्याहाळतो. त्यावेळी आशिषच्या मनात शंका आली की, याच्याकडे शब्दसंपत्ती नसल्यामुळे याला व्यक्त होण्यात अडचण तर येत नसेल ना? मग अडीच – पावणे तीन वर्षांच्या जन्मेषसाठी त्याने बरीच पुस्तकं आणली. ती पुस्तकं तो जन्मेषच्या पुढ्यात ठेवायचा. मग जन्मेष त्याला हवं ते पुस्तक निवडायचा आणि आशिष ते पुस्तक त्याला वाचून दाखवायचा, असं चक्र सुरू झालं. त्या – त्या पानावर असणाऱ्या चित्राविषयी आशिष जन्मेषसोबत वेगवेगळे प्रश्न विचारत चर्चा करायचा. उदा. ‘हा रंग तू कुठे पाहिला आहेस का, हे काय आहे’ इ. सुरूवातीला जन्मेष जास्त प्रतिसाद द्यायचा नाही, तेव्हा आशिष स्वत: त्याला त्या चित्राबद्दल सांगायचा. नेमकं त्याच काळात जन्मेषकडे त्या पुस्तकांतील चित्रांसारखीच फळांच्या व भाज्यांच्या आकाराची व पुस्तकातल्या रंगांची खेळणी होती. त्यामुळे पुस्तकातलं चित्र व प्रत्यक्ष ते खेळणं यांतील साधर्म्य ओळखून व त्याचा एकमेकांशी संबंध लावून हळूहळू पुस्तकातली चित्रे जन्मेष ओळखू लागला. 

मग ३ वर्षांचा झाल्यावर आशिषने जन्मेषकरिता एका पानावर मोठ्या आकारतलं चित्रं व त्याखाली एखाद-दुसरी ओळ अशाप्रकारची पुस्तकं आणायला सुरूवात केली. पुस्तकांतील पानांवरचा मजकूर आशिष जन्मेषला हावभाव, अभिनय वगैरे करून वाचून दाखवायचा. याकरिता त्याने सुरूवात केली ती From Hand to Toe आणि Cave Baby या दोन पुस्तकांनी. पुस्तक वाचताना ते डावीकडून उजवीकडे वाचतात, वरून खाली वाचतात आणि पान वाचून झालं की ते उलटायचं असतं ह्या गोष्टी आशिष ठरवून जन्मेषला दाखवायचा. या दोन्ही पुस्तकांतली चित्रं अतिशय बोलकी होती. जन्मेषचं लक्ष पुस्तकातल्या मजकूरापेक्षा त्यातल्या चित्रांकडेच जास्त असायचं. त्यामुळे आशिष जरी त्याला ते पुस्तक वाचून दाखवत असला तरी, तो मात्र ते पुस्तक त्यातल्या चित्रांच्या माध्यमातून समजून घेत असे. पुढेपुढे तर तो पानांवरचं चित्र पाहून त्यात कोणता प्रसंग दाखवला आहे, चित्रात कोणकोण आहे, तिथे काय चालू आहे ते व्यवस्थित सांगू लागला. या सगळ्यातून एक खूप महत्त्वाची गोष्ट आशिषला जाणवली, ती म्हणजे मुलांच्या सुरूवातीच्या काळात त्यांची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी, भाषाविकास होण्यासाठी मोठ्या मजकूरापेक्षा चित्रंच जास्त फायदेशीर ठरतात. म्हणून मग त्याने जन्मेषकरिता ‘माधुरी पुरंदरे’ यांच ‘चित्रवाचन’ हे पुस्तक आणलं. या पुस्तकात विविध विषयाला धरून लहान मुलांना आवडतील अशी चित्रे आहेत. आशिष सांगतो की, या पुस्तकाचा जन्मेषला प्रचंड फायदा झाला. त्यातील चित्रांचे निरीक्षण करून तो ३-४ शब्दांची छोटी-छोटी वाक्यं बनवू लागला. चित्रातील परिचित बाबींची माहिती त्याच्या स्वत:च्या शब्दांत सांगू लागला.

पुढे मग आशिषने जन्मेषसाठी ‘माधुरी पुरंदरे’ यांच्या ‘राधाचं घर’ या मालिकेतली पुस्तकं आणली. आत्तापर्यंत त्याने जन्मेषसाठी आणलेल्या पुस्तकांत सुसंगत मजकूर (किंवा गोष्ट) नव्हती. त्यांतील एका पानावरील चित्र व मजकूर यांचा पुढच्या पानावरील चित्राशी व मजकूराशी संबंध नसायचा. ‘राधाचं घर’ या पुस्तक मालिकेतील प्रत्येक पुस्तकांत मजकूर आणि चित्र यांच्या मदतीने एकच गोष्ट पुढे पुढे जाते. पुस्तकांतील गोष्टीत दैनंदिन जीवनात घडणारे प्रसंग होते, त्यातील पात्रे म्हणजे घरोघरी आढळणाऱ्या व्यक्तिरेखा होत्या. या सगळ्या बाबींमुळे जन्मेषशी त्या पुस्तकाशी विशेष तार जुळली. ही पुस्तकं ऐकताना तो अजिबात कंटाळायचा नाही.

आशिष जन्मेषमधल्या काही वैशिष्ट्यपूर्ण बदलांबद्दल आवर्जून इथे सांगू इच्छितो. पहिला बदल म्हणजे त्याच्या कलाकृतींमधली प्रगती आणि दुसरं म्हणजे त्याचं संभाषण कौशल्य. जन्मेषला पहिल्यापासूनच चित्रं काढायला, ते रंगवायला खूप आवडायचं. आता त्याच्या चित्रांमधे तो अनेक बारीक बारीक तपशील दाखवू लागला आहे. जसे की, आधी तो फक्त रेल्वेचं चित्रं काढायचा, आता तो रेल्वे, रेल्वे फाटक, स्टेशन इ. तपशील काढू लागला आहे. जन्मेषला लिगोचे ठोकळे वापरून वेगवेगळ्या कलाकृती बनवायचासुद्धा छंद आहे. पूर्वी तो अगदी साध्यासाध्या कलाकृती जसे की घर वगैरे बनवायचा. आता तो त्यात, घराला असलेलं छप्पर, खिडकी, खुराडा, बागबगीचा यांचीही भर घालतो. आता जन्मेष आपल्या प्रत्येक कलाकृतीबद्दल मग ते चित्र असो की लिगो असो, भरभरून बोलू लागला आहे. ह्या सगळ्यात आणखी एक गोष्ट आशिषला ठळकपणे जाणवली. पूर्वी जन्मेषला समोरच्याने विचारलेले प्रश्न समजायचे नाहीत किंवा तो पठडीतल्या प्रश्नांनाच उत्तर द्यायचा – जसे की, तुझं नाव काय, कुठे राहतो वगैरे. जर कोणी त्याला एखादा सवय नसलेला प्रश्न विचारला तर त्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता यायचं नाही. पण आता जन्मेषला समोरच्याचे प्रश्न कळतात, तो त्या प्रश्नांची उत्तरं तर देतोच शिवाय समोरच्याला अर्थपूर्ण व सुसंगत प्रश्नही विचारतो.

आपल्या पाल्यामधला हा बदल पाहून आशिष व अंजू दोघेही मनोमन सुखावले आहेत. हळूहळू जन्मेषला स्वतंत्रपणे वाचन करता यावे यासाठी आशिष प्रयत्न करणार आहे. 

जन्मेषचा चित्रांपासून सुरु झालेला पुस्तक-प्रवास सध्या गोष्टींकडे वळला आहे. या विषयांतले अभ्यास सांगतात की अगदी आईच्या गर्भात असल्यापासूनच मुलं पुस्तकांना प्रतिसाद देतात. आपण वाचन आनंद सप्ताह मालिकेत विविध मुलांच्या आयुष्यात पुस्तकं काय भूमिका बजावतात हे पाहिलं. ही प्रातिनिधिक उदाहरणं होती. कित्येक पालक आपल्या मुलांची पुस्तकांशी मैत्री व्हावी म्हणून वेगवेगळे प्रयोग करत असतात. या लेखांच्या मालिकेतून आम्ही त्या सर्व पालकांना सलाम करू इच्छितो. तुम्ही आपलं बाळ भविष्यात जबाबदार आणि सऱ्हदयी व्हावं यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करत आहात. इथे एक महत्वाचा मुद्दा आम्हाला मांडायचा आहे. पुस्तक वाचनाचं उद्दिष्ट  केवळ मुलाचा काहीतरी विकास व्हावा, त्याला ज्ञान मिळावं, त्याला लिहिता वाचता यावं इतकं मर्यादित नसायला हवं. निखळ आनंद, मनोरंजन पुस्तकांमधून मिळवता यावे. पुस्तक वाचन ही एक प्रकिया आहे, ते फक्त काहीतरी साध्य करण्याचं साधन नक्कीच नाही. जसं कुणाशी मैत्री करताना आपण काही उद्दिष्ट ठेवत नाही, कारण मैत्री करणं ही आपली गरज असते. तसंच पुस्तक वाचणं, त्यातल्या कथेचा, चित्रांचा आनंद घेणं ही आपली गरज आहे. केवळ लहान मुलंच नव्हे तर सगळ्यांची ही गरज पूर्ण होवो ही सदिच्छा! 

आशिष केळशीकर : गणित अध्यापक CEQUE

अंजू केळशीकर : गृहिणी 

संपर्क : ashu143@gmail.com

जन्मेशच्या आवडीची पुस्तकं

पुस्तक  लेखक चित्रकार प्रकाशक 
राधाचं घर (५ पुस्तकांचा संच) माधुरी पुरंदरे माधुरी पुरंदरे ज्योत्स्ना प्रकाशन
From Hand to Toe Eric Carle Eric Carle Haper Collings Publishers
Cave Baby Julia Donaldson Emily Gravett Macmillan Children’s Books
चित्रवाचन माधुरी पुरंदरे ज्योत्स्ना प्रकाशन
The Paper Dolls Julia Donaldson Rebecca Cobb Macmillan Children’s Books 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *