शब्दांकन: रश्मी मुसळे-साळगांवकर

आपल्या पाल्यात होणारे छोटे-छोटे बदल पालकांच्या नजरेतून कधीच सुटत नाहीत आणि पाल्यात होणारे हे बदल चांगले व योग्य असले पाहिजेत हेच त्यांना वाटत असतं. सचिन आणि कीर्तीसुधा हेदेखील त्याला अपवाद नव्हते. म्हणूनच आपल्यामधे जे जे काही चांगलं आहे आणि ज्याचा आपल्या आयराला एक माणूस, एक व्यक्ती म्हणून घडताना फायदा होणार आहे ते सर्व आपण आयराला द्यावं हाच विचार सचिन आणि कीर्तीसुधाने केला. आयरा आता अडीच वर्षांची आहे. आयरा जेव्हा अगदी लहान होती तेव्हाचा काळ थोडा कठीण होता. कारण नेमकी त्याचवेळी देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जाहीर झाली होती. त्यामुळे एरवी एखाद्या लहान मुलाला ज्या-ज्या गोष्टी अगदी सहजरित्या पहायला, अनुभवायला मिळतात त्या आयराला मिळणार नव्हत्या. मात्र आपल्या तान्हुलीचे सुरुवातीचे दिवस समृद्ध करण्यासाठी तिच्या आई बाबाकडे पुस्तकांचा, चित्रांचा आणि बडबडगीतांचा मार्ग होताच. ज्याला ज्यावेळी आयराला वेळ देणं शक्य आहे त्याने तो तो वेळ आयराबरोबर घालवायचा, तसेच तिला भाषेचं, पुस्तकांचं, बालगीतांच्या विश्वाचं जग खुलं करून देण्याचं त्यांनी ठरवलं.

आयराच्या बाबाची मातृभाषा मराठी आहे तर आईच्या घरी हिंदीचा वापर जास्त होतो. त्यामुळे सहाजिकच अगदी लहानपणापासून आयराच्या कानावर दोन वेगवेगळ्या भाषा पडत होत्या. त्याचा फायदा आयराच्या भाषिकविकासाला चालना देणारा ठरला. त्यामुळे “बाबा म्हणजे खूप, आणि नानीमाँ म्हणजे बहोत” असा फरक ती बोलून दाखवायला लागली. आयरा अगदी एक वर्षाची असल्यापासून सचिनने ठरवून तिच्याकरिता मराठी बडबडगीतांची पुस्तकं आणली आणि त्यातली गाणी स्वत: तिला गाऊन दाखवायला सुरूवात केली. नंतर मराठी बरोबरच हिंदी व इंग्रजीतल्या बडबडगीतांच्या पुस्तकांचाही यात समावेश करून घेतला. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे लहान मुलांसाठीच्या गोष्टींच्या पुस्तकांची. सचिनला याबाबतीत जाणवलेली एक खंत मात्र त्याने व्यक्त केली. ती अशी की, मराठी बालसाहित्यात ३ वर्षांखालील मुलांसाठी चांगल्या दर्जाची, मोठी चित्रं असलेली, कमी मजकूर असलेली, शब्दांची पुनरावृत्ती असलेली अशी पुस्तकं अतिशय कमी आहेत. शिवाय आयराच्या सुरूवातीच्या दीड-दोन वर्षांपर्यंतच्या काळात कामानिमित्त त्यांचं कुटुंब महाराष्ट्राबाहेर वास्तव्याला होतं. त्यामुळे तिथे त्याला मराठी भाषेतली पुस्तकं उपलब्ध व्हायचीच असंही नाही. मग सचिनने इंग्रजी भाषेतली अशी मोठंमोठी चित्रं असलेली, अतिशय कमी मजकूर व काही विशिष्ट शब्दांची पुनरावृत्ती असलेली पुस्तकं आयरासाठी आणली. त्यातली चित्रं तो आयराला दाखवत असे, गोष्टी वाचून दाखवत असे.  चित्रांच्या आधाराने तो स्वत:च एक वेगळी गोष्ट रचून आयराला सांगत असे. 

सचिनचे हे सगळे प्रयत्न आयराचा मेंदू टीपकागदासारखं टीपून घेत होता. या सगळ्याची परिणती आयराच्या बाल्यावस्थेतल्या आवडीनिवडी ठरण्यात झाली. ज्या वयात इतर मुलं या ना त्या कारणाकरिता मोबाईल घेऊन बसायची त्याच वयात आयरा मात्र पुस्तकं स्वतः पुस्तकं घेऊन बसायची, बडबडगीते ऐकवायला सांगायची. आयराच्या विकासातली ही विशेष बाब तिच्या पालकांना तेव्हा जाणवली आणि ते मनोमन सुखावले. पुढे जेव्हा आयरा दीड वर्षाची झाली तेव्हा तर तिची पुस्तकांबद्दलची स्वत:ची अशी आवड विकसित झाली होती. तिच्या आवडीची पुस्तकं ती परत परत वाचून दाखवायला सांगायची. मग सचिनचा उत्साहदेखील द्विगुणित व्हायचा. मग पुढेपुढे सचिन व कीर्तीसुधा एक गंमत म्हणून गोष्टीतल्या त्या पात्रांच्याजागी आयराच्या घरातील माणसांना ठेवून आयराला गोष्ट सांगायचे जसे की, ‘यश’ या पुस्तकाच्या मालिकेतील यश म्हणजे आयरा, त्याचा बाबा म्हणजे सचिन. पुस्तकाच्या नाट्यीकरणापर्यंत पोहचण्यासाठी आयराला फारच कमी वेळ लागला. तिचं भावविश्व अशाप्रकारे हळूहळू समृद्ध होत आहे. सचिन पुढे सांगतो की आयरा बोलायला जरी उशीरा लागली असली तरी आम्ही जेव्हा तिला गोष्ट वाचून दाखवायचो, बडबडगीतं ऐकवायचो तेव्हा ती त्याला साजेशा हालचाली व थोडाफार अभिनय मात्र नक्की करायची. मग पुढे जेव्हा आयरा बोलायला लागली तेव्हा असं होऊ लागलं की, आई किंवा बाबांनी बडबडगीताची ओळ म्हटली की आयरा स्वत:च उरलेली ओळ पूर्ण करायची. बोलायला शिकल्यावर आयराची गाडी अगदी सुसाटच निघाली होती. 

पुस्तकांच्या सोबतीमुळे आयारामध्ये झालेले महत्वाचे बदल बघून कीर्तीसुधामधला मानसशास्त्रज्ञ जागा होतो. आयराला वाढवताना मानसशास्त्रातील संकल्पनांचा पुन्हा संदर्भ लागतो. त्या संकल्पना कुठे आणि कशा लागू पडतात हे प्रत्यक्षात दिसतं. ज्या वयात मुलांना सतत कुणीतरी सोबत बसलेलं हवं असतं त्या वयात आयरा स्वतःहून पुस्तकं घेते आणि त्यात एकटी गुंतून राहते. ती अर्ध्या तासापर्यंत पुस्तक चाळते, त्यात रमते. तिच्या वयाच्या मानाने अर्धा तास हा कालावधी वाखाणण्याजोगा आहे. आवडीचं पुस्तकं दिसलं की त्यातली गाणी ती आपणहून  गुणगुणायला सुरुवात करते. सचिनने एकदा काही पुस्तकं मागवली होती. बरेच दिवस त्याने ते पार्सल न उघडता तसंच ठेवलं होतं. आयरा त्या पुस्तकांच्या ठोकळ्याशी छान खेळायची, त्यावर चढून बसायची, उभी राहायची. जेव्हा सचिनने ते पार्सल उघडलं तेव्हा मात्र आयराची प्रतिक्रिया बदलली. त्यातली पुस्तकं मोठ्या माणसांची होती, त्यात तिला आकर्षक वाटतील अशी चित्रंही नव्हती. तरीही आयारा ती पुस्तकं उघडून बसली. त्याचं मुखपृष्ठ कोणतं, मलपृष्ठ कोणतं याची तिला जाणीव होती. वाचताना डावीकडून उजवीकडे वाचतात, वरून खाली वाचतात, वाचून झालं की पान उलटून पुढच्या पानावर जायचं असतं हे तिला समजायला सुरुवात झाली होती. अगदी साक्षर असल्याप्रमाणे ती पुस्तकं हाताळत होती. हे literate behaviour तिच्या विकासातील फार महत्वाचा टप्पा आहे. तिच्या पुस्तकात एका पक्ष्याचं चित्रं होतं. तेच चित्र तिच्या एका फ्रॉकवर देखील होतं. या दोन्हीतला सारखेपणा तिने लगेच ओळखला. पुस्तकांबरोबरच अक्षरांच्या पाट्या, पझल्स या गोष्टी पण आयराच्या नेहमीच्या खेळण्याचा भाग आहेत. तिची पुस्तकं तिच्या खेळण्यांच्या बॉक्समध्येच ठेवलेली आहेत. त्यामुळे ती सहजतेने हवं तेव्हा पुस्तकं घेऊ शकते. पुस्तकं ही खेळण्यांप्रमाणेच रंजक असतात, त्यांना कपाटात बंद करून ठेवण्याची गरज नाही. हे कीर्तीसुधा आवर्जून सांगते.   

आयराला पुस्तकांची ओळख करून देण्यात तिच्या आत्याची भूमिकाही महत्वाची आहे. आत्या तिला नेहमी वेगवेगळी पुस्तकं पाठवते, आत्याच्या मुलाची पुस्तकं वाचून झाली की तीही आयराला मिळतात. Whatsapp कॉलवर आत्या आयराला बडबड गीतं म्हणून दाखवते. कधी भेटली तर जवळ घेऊन पुस्तक वाचून दाखवते. कीर्तीसुधा इथे एक महत्वाची गोष्ट शेअर करते. ती म्हणते, “एकेरी कुटुंबात, आई बाबा दोघंही नोकरी करत असतील तर मुलांना पुस्तकं वाचून दाखवण्यासाठी वेळ देताना त्यांची खूप तारांबळ उडते. शहरी जीवनशैलीत मुलांबरोबर quality time घालवणं सगळ्यांना शक्य होतंच असं नाही. टीव्ही आणि मोबाईल स्क्रीनला सशक्त पर्याय उपलब्ध करून देण्याची कितीही इच्छा असली तरी ही इच्छा प्रत्यक्षात उतरतेच असंही नाही. अगदी छोट्या मुलांसाठी वेगळी पुस्तकं असतात, लायब्ररी असते याबाबत बरेच पालक अनभिज्ञ असतात. अशा सर्व पालकांना जेव्हा पुस्तकांचं महत्व आणि टीव्हीचे दुष्परिणाम  आम्ही सांगतो तेव्हा त्यांना आपण पालकत्वाच्या पातळीवर कुठेतरी कमी पडतोय याची खंत देखील वाटते.” योग्य वयात योग्य माहिती पालकांपर्यंत पोहचायला हवी, तशी माहिती देणारे सोबती आपल्या आजूबाजूला असतील तर पालकत्व समृद्ध होऊ शकतं असं कीर्तीला प्रकर्षाने वाटतं. 

लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जसं त्याच्या आहाराकडे बारीक लक्ष देतो ना अगदी तसंच त्यांची ज्ञान मिळवण्याची क्षमता, त्यांचा शारीरिक, भाषिक, सामाजिक व भावनिक विकास यांकडेही त्याचवेळी व तितकच लक्ष पुरवणं आवश्यक असतं. बाळाची सुरुवातीची दोन वर्षं त्याच्या बौद्धिक विकासासाठी महत्वाची असतात. या काळात पुस्तकांचा कल्पकतेने वापर केला तर त्याचे दूरगामी फायदे होतात. बाळाची भाषा, कल्पनाशक्ती, बैठक विकसित होण्यासाठी पुस्तकांची मदत होते. एकदा का त्याची मातृभाषेवर छान पकड आली की जगातली कोणतीही भाषा शिकणं सुकर होतं. पुस्तकांमुळे विचारांच्या कक्षा रुंदावतात. ज्या गोष्टी प्रत्यक्ष पाहण्याला, अनुभवण्याला मर्यादा येतात त्या गोष्टींची देखील अनुभूती पुस्तक वाचनातून या चिमुकल्यांना देता येते. नेमकं हेच केलं आयराच्या बाबानी. शिवाय त्यांच्या प्रयत्नांना आईच्या बालमानसशास्त्राची जोडदेखील होतीच. त्यातूनच अवघ्या दोन वर्षांच्या आयराचं बालपण समृद्ध झालं आहे.  

आयराच्या आवडीची पुस्तकं 

पुस्तक  लेखक  प्रकाशक 
Dappy Dog Learns to be Honest Golden Minds Publishing House
यश – ५ पुस्तकांची मालिका माधुरी पुरंदरे  ज्योत्स्ना प्रकाशन
राधाचं घर माधुरी पुरंदरे  ज्योत्स्ना प्रकाशन

सचिन तिवले, Assistant Professor, TISS (Tata Institute of Social Sciences), Mumbai 

कीर्तीसुधा राजपुत, Lecturer in Rehabilitation Psychology, NIEPID, Regional Centre, Kolkata

संपर्क: sachin.tiwale@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *