Joy of Reading Week अर्थात वाचन-आनंद सप्ताहात आज दोन वर्षांच्या अबीरविषयी वाचूया 

शब्दांकन – रश्मी मुसळे – साळगांवकर

अबीरविषयी लेख लिहिताना मी त्याचा एक फोटो बघितला. त्या फोटोत दिड- दोन वर्षांचा अबीर पुस्तक कुशीत घेऊन झोपला होता. हा फोटो माझ्या मनात घर करून राहिला. सहसा लहान मुलं झोपाळ्यात त्यांचं आवडतं खेळणं किंवा त्यांची आवडती वस्तू घेऊन झोपतात. पण अबीरच्या हातात पुस्तक बघून मला आश्चर्य वाटलं. त्याला पुस्तकाविषयी इतकी जवळीक निर्माण झाली यात त्याच्या पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे.

 डॉ. स्वाती आणि डॉ. गणेश यांचा मुलगा अबीर सध्या २ वर्षांचा आहे. त्यांनी आपल्या अबीरच्या बाबतीत काही गोष्टी सुरूवातीलाच पक्क्या ठरवल्या होत्या. पहिली गोष्ट, त्याला कुठल्याही प्रकारची screen म्हणजेच टी.व्ही, मोबाईल, लॅपटॉप इ. न दाखवणं, दुसरं म्हणजे त्याऐवजी त्याला अगदी लहान वयापासूनच पुस्तकांचा लळा लावणं आणि तिसरं म्हणजे त्याच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणं. या दोघांनी हे सुत्र तंतोतंत पाळलं. डॉक्टर दांपत्य असल्यामुळे दोघांनाही मुलांना लहान वयात screen दाखवण्याचे दुष्परिणाम चांगलेच माहित होते. शिवाय लहान मुलांसाठी पालकांचा सहवास आणि पुस्तकांबरोबरची मैत्री किती उपयुक्त असते याचीही त्यांना जाणीव होती. 

अबीरचा वाचन-प्रवास सुरू झाला तेव्हा तो अवघा ७-८ महिन्यांचा होता. नुकताच पालथा पडू लागल्यावर त्याच्या आई-बाबानी त्याच्यासमोर प्राण्यांची मोठी चित्रे असलेली पुस्तके ठेवायला सुरूवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, अबीर या चित्रांमधे रमतो आहे. म्हणून मग त्यांनी अबीरला त्या चित्रातल्या प्राण्यांची प्रतिकृती असलेले खेळण्यातले छोटे प्राणीसुद्धा आणून दिले. याच काळात स्वाती आणि गणेशने अबीरला बडबडगीतं गाऊन दाखवायला सुरूवात केली. अबीरची प्राण्यांची आवड लक्षात घेऊन गणेश त्याच्याकरिता प्राण्यांच्या गोष्टी असलेली  पुस्तके घेऊन येऊ लागला. त्यातील गोष्टी अभिनयासहित अबीरला वाचून दाखवू लागला. पुढेपुढे तर गोष्टीतील पानावरचं त्या-त्या प्राण्याचं चित्र पाहून अबीर स्वतःच त्या  प्राण्याचा आवाज काढू लागला. गणेश सांगतो की, १० महिन्यांच्या अबीरला जवळजवळ ३०-३५ प्राण्यांचे आवाज काढता येऊ लागले होते. हा अनुभव गणेशसाठी खास होता कारण, जेव्हा अगदी सुरूवातीला गणेश अबीरला प्राण्यांच्या गोष्टी असलेली पुस्तक वाचून दाखवत होता तेव्हा त्याला वाटायच की, मी नुसताच वाचतोय. पण  अबीर जेव्हा त्याच्या वाचनाला प्रतिसाद देऊ लागला तेव्हा गणेशला आपण करत असलेल्या प्रयत्नांच चीज झाल्यासारखं वाटू लागलं. काही मुलं भवतालच्या वातावरणाला लवकर प्रतिसाद देऊ लागतात तर काहीजण उशीरा, कारण प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्याच्या वाढीचा, प्रगतीचा वेगही वेगवेगळा असतो.  

मुलांचा जन्माच्याआधी ३ महिन्यांपासून ते जन्मानंतरच्या ९ व्या महिन्यांपर्यंतचा काळ हा त्यांच्या भाषाविकासाच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. कारण याच काळात ते आपली मातृभाषा अतिशय वेगाने शिकत असतात. त्यामुळे अगदी काही दिवसांच्या फरकानेसुद्धा मुलांच्या सर्वांगीण विकासामधे आपल्याला अनेक महत्त्वाचे बदल दिसून येऊ लागतात. याचा अनुभव गणेश व स्वाती या दोघांनाही आला. एक-सव्वा वर्षांचा असताना अबीर हळूहळू एक-एक शब्द बोलू लागला, मग बडबडगीते बोलू लागला आणि अल्पावधीतच त्याने ३-४ शब्दांच्या अर्थपूर्ण वाक्यांपर्यंत मजल मारली. दीड वर्षांचा अबीर चक्क ४-५ अर्थपूर्ण व सुसंगत वाक्यांमधे अभिव्यक्त होऊ लागला होता. स्वत:चे अनुभव, भावना, प्रसंग स्वत:च्या शब्दांत मांडू लागला होता. शब्दसंपत्ती वाढू लागली होती. त्याचबरोबर स्मरणशक्ती व आकलनशक्तीही विकसित होत होती. याविषयीची एक बाब जी गणेश व स्वाती यांना विशेष म्हत्त्वाची वाटली ती म्हणजे अगदी लहान वयापासूनच अबीर काळ व लिंग यांनुसार क्रियापदामधे होणारा बदल लक्षात घेऊन त्याप्रमाणे वाक्यरचना करू लागला होता. पुस्तक आणि सहवास यांच्याजोडीनेच गणेश व स्वातीने अबीरसोबत एक खूप महत्त्वाची गोष्ट केली होती, ती म्हणजे ते अबीरशी खूप बोलायचे. अगदी तो तान्हं बाळ असल्यापासून. गणेश कौतुकाने सांगतो, “याबाबतीत स्वातीने आधीच बजावलं होत की, आपण दोघांनीही अबीरशी बोलताना स्पष्ट शब्दांतच बोलायचं. सारखं बोबडं बोलायचं नाही!” यामुळेच अबीरचे उच्चारही अगदी स्पष्ट असतात. मूल जसं आई-वडीलांच्या सान्निध्यात शिकत असतं, तसंच ते त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असतं, आत्मसात करत असतं. ही बाब या दोघांना प्रकर्षाने जाणवली, कारण कधीकधी बोलताना अबीर मधेच असा एखादा शब्द वापरतो जो गणेश व स्वाती दोघांनीही बोलताना कधीच वापरलेला नसतो. 

आपल्याला आजूबाजूला हल्ली सर्रास असं चित्र दिसून येतं की, मुलं खाऊ भरवताना खूप त्रास देतात, त्यांना मोबाईल हवा असतो. पण गणेश आवर्जून सांगतो की, अबीर मात्र खाऊ भरवताना वेगळाच हट्ट करायचा. खाताना कधीकधी त्याला बाबाने पुस्तक वाचून दाखवावंसं वाटायचं, तर कधी बाबाने गाणं म्हणून हवं असायचं. गणेश अबीरला बडबडगातींच्या जोडीने मराठी व हिंदीतली अगदी अवजड शब्द असलेली गाणीदेखील गाऊन दाखवायचा. हळूहळू  अबीर त्यांनाही प्रतिसाद देऊ लागला.

अबीर आता २ वर्षांचा झाला आहे. जुनी पुस्तकं तर त्याला पाठच झाली आहेत. पण तरीही त्याला ती पुन्हा पुन्हा हवी असतात. एवढं असूनही गणेश व स्वातीने त्याच्यासाठी पुस्तकं आणणं मात्र सुरूच ठेवलं आहे. पुस्तकांमुळे त्याच्या जडण घडणीतल्या विशेष गोष्टी त्यांच्या लक्षात येत आहेत. Self awareness म्हणजेच स्वतःबद्दलची  त्याची जाणीव छान विकसित होत आहे. पुस्तकांच्या जोडीने त्यांनी अबीरसाठी आता पाटी-पेन्सिल आणि रंगवण्याची छापील चित्रं असलेली पुस्तके आणायला सुरूवात केली आहे. ‘असं रंगव किंवा तसं रंगवू नको, खराब करू नको’, वगैरे काहीही न सांगता मनसोक्त व मुक्तपणे ती पुस्तकं रंगवण्याची मुभा या दोघांनी अबीरला दिलेली आहे. त्यामुळे अबीरही ती चित्रं त्याला हवी तशी रंगवतो, अगदी बरबटवूनसुद्धा टाकतो. तसंच पाटी-पेन्सिल घेऊन काही ना काही खरडतो आणि मग त्याने काय काढलं आहे ते समोरच्याला व्यवस्थित समजावून सांगतो..

गणेश म्हणतो, प्रत्येक पालकाला वाटतं की, “आपण मुलांना शिकवतो आणि मूलं फक्त शिकण्याचं काम करतात. पण ते तसं नसतं. मुलांबरोबरच आपणही एक पालक म्हणून शिकत असतो, तयार होतच असतो, शिवाय एक माणूस म्हणूनदेखील घडत असतो.” जेव्हा देशात कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली होती तेव्हा देशभरातल्या डॉक्टरांना खासजी व सरकारी दवाखान्यांमधे, इस्पितळांमधे कामाकरिता रुजू होण्यास सांगण्यात आलं होतं. गणेश व स्वाती हे महाराष्ट्राबाहेर एका खासगी इस्पितळामधे नोकरी करतात. डॉक्टर असल्याने त्यांनाही त्या तशा काळात कामावर जाणं भाग होतं. गणेश तो अनुभव सांगताना म्हणतो की, “तो काळ खूप भयानक होता. आम्ही प्रचंड तणावाखाली होतो, कारण एक तर आमच्या कामाच असलेलं स्वरूप आणि दुसरं म्हणजे आमचं बाळसुद्धा अगदी लहान होतं. त्यातल्या त्यात फक्त एकच गोष्ट होती जी आम्हाला हा सगळा ताण काही काळ का होईना पण विसरायला लावत होती. ती गोष्ट म्हणजे आमच्या बाळाचा सहवास, त्याच्यासाठी नवनवीन गोष्टी करणं  आणि त्याची कलेकलेनं होणारी वाढ पाहायला व अनुभवायला मिळणं. त्या काळात आम्ही स्वत:ला शांत आणि खंबीर ठेवू शकलो ते फक्त अबीरमुळे”. 

डॉ. गणेश मैड : हृदयरोगतज्ञ, हैद्राबाद

डॉ. स्वाती देशमूख : स्त्रीरोगतज्ञ, हैद्राबाद

संपर्क : ganeshvmaid@gmail.com

अबीरच्या आवडीची पुस्तकं 

पुस्तक  लेखक चित्रकार प्रकाशक 
राधाचं घर (५ पुस्तकांचा संच) माधुरी पुरंदरे माधुरी पुरंदरे ज्योत्स्ना प्रकाशन
एकशे सदतिसावा पाय माधुरी पुरंदरे माधुरी पुरंदरे
The Foolish Goats (Aesop’s Fables) Shree Book Centre
अमर बालसाहित्य पंचतंत्र
The Dog and the Crocodile Shree Book Centre
Aesop’s Fables
Ellie’s Party Gitt
Early Readers
The Horse and the Lion Shree Book Centre
The Father Dog Shree Book Centre
किलबिल बडबडगीते Navneet Education India Ltd.
विकास शिशूवाचन नवनीत
Panchatantra
Hitopadesha Tales
विकास बोधकथा Navneet Education India Ltd.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *