शब्दांकन – मुक्ता नावरेकर

घरात नवीन बाळ आलं की खेळण्यांची रेलचेल व्हायला सुरुवात होते. येणारे नातेवाईक देखील खुळखुळे, चिमणाळं, चोखणी अशी खेळणी बाळाला रमवण्यासाठी कौतुकाने आणतात. ज्या वयात बाळांना ही खेळणी दाखवून कौतुकाचे बोबडे बोल ऐकवले जातात त्या वयात रेयांश (किकू) चे आई बाबा अजून एक महत्वाची गोष्ट करत होते. दोन महिन्याच्या किकूला ‘ बी लावलं, काकूचं बाळ, Just One More Swim, ऊ टू ची गोष्ट’ ही पुस्तकं वाचून दाखवत होते. त्यातल्या चित्रांवर आपल्या बाळाशी गप्पा मारत होते. आणि ते पिटकूलं बाळ देखील हुंकार देऊन त्यांना प्रतिसाद देत होतं! 

शालिनी आणि राजेश यांचा मुलगा रेयांश आता साडेचार वर्षांचा आहे. त्याला अगदी लहान वयापासूनच पुस्तकांशी ओळख करून देण्याबाबत ही दोघे जागरूक होते. या मागचं कारण विचारल्यावर शालिनी म्हणाली, “मूल कितीही लहान असलं तरी ते आपलं बोलणं ऐकत असतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाषांमधली पुस्तकं वाचून दाखवली, त्यावर गप्पा मारल्या, त्यातली चित्रं दाखवली तर मुलाची भाषिक जाणीव विकसित होण्यासाठी मोठी मदत होते. पुस्तकातली पात्रं, वाचणाऱ्याच्या आवाजातले चढ उतार या साऱ्यांचा मुलाची भाषा आणि बोलणं विकसित होण्यावर परिणाम होत असतो. किकूला अगदी लहान असतानापासून आम्ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतली भरपूर पुस्तकं वाचून दाखवली. ‘चिकूपिकू’ हे मासिक लावलं जे तो आम्हाला असंख्य वेळा वाचून दाखवायला लावतो.”

 

किकूच्या पुस्तक वाचनाची पूर्वतयारी शालिनीने त्याच्या जन्माच्या आधीपासूनच केली होती. बाळाच्या आगमनाची चाहूल लागताच तिने त्या बाळाचं पुस्तक बनवलं. त्यावर मोठ्या ठळक अक्षरात मजकूर लिहिला, चित्रं आणि फोटो चिकटवले. कुटुंबातील सदस्यांविषयी त्यात लिहिलं होतं. त्यांची नावं, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी लिहिल्या होत्या. ‘पुस्तक कायम इतरांनी लिहिलेलंच का असावं? आपण स्वतः आपलं पुस्तक बनवू शकतो, कोणीही आणि कोणावरही पुस्तक लिहू शकतं’ हा तिचा यामागचा विचार होता. किकूला हे पुस्तक फार आवडतं. अजूनही तो ते घेऊन बसतो, वाचायला लावतो. 

 

 

लहान वयात मुलं काही विशिष्ट गोष्टींचा कंटाळा करतात, काही गोष्टी करायला चक्क ‘नाही’ म्हणतात, मागे लागायला लावतात. किकू देखील याला अपवाद नाही. लिपी किंवा अंक ओळख म्हटलं की त्याचा नकार असतो. मात्र एका गोष्टीला तो कधीही नकार देत नाही ती म्हणजे पुस्तक वाचन. त्याला पुस्तकं सहज हाताळता यावी यासाठी घरात त्याचा हात पोहचेल अशा उंचीवर त्याची सगळी पुस्तकं ठेवलेली आहेत. कोणतंही पुस्तक कधीही घेण्याचं त्याला पूर्ण स्वातंत्र्य देखील आहे. शालिनीने त्याच्या पुस्तकांसाठी कापडी पॉकेट बोर्ड स्वतः हाताने शिवून तयार केला आहे. त्यामुळे भरपूर पुस्तकं त्याच्या डोळ्यासमोर असतात. ‘पुस्तक फाटेल ही भीती बाळगून आम्ही त्याला पुस्तकांपासून कधीच दूर ठेवलं नाही. फाटलेलं पुस्तक चिकटवता येतं. अगदीच गरज पडली तर पुन्हा आणता येतं. मात्र ते फाटेल या भीतीनं मुलांच्या हातीच लागू न देणं योग्य नाही’’ असं तिचं मत आहे. शालिनी आणि राजेश दोघंही दिवसभर कामात असतात. मात्र जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा ते किकूला जवळ घेऊन पुस्तकं वाचून दाखवतात. तो साडेतीन वर्षांचा असताना त्याच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट हमखास पुस्तक वाचनानेच होऊ लागले. जेवताना, दूध पिताना टीव्ही लावून बसलेली लहान मुलं आपण नेहमीच पाहतो. किकू मात्र खाताना पुस्तकांवर गप्पा मारत असतो!

किकूच्या पुस्तकांच्या जगाविषयी शालिनी भरभरून बोलत होती. तिच्या आवाजात वाचनाविषयी पॅशन आणि पुस्तकांवरच प्रेम ओसंडून वाहत होतं. ती म्हणाली की या सगळ्याचे विशेष परिणाम आम्हाला किकूमध्ये जाणवले. अगदी लहान वयात तो लांबलचक वाक्य नीट बोलू लागला. एखाद्या गोष्टीची कारणमीमांसा तो व्यवस्थित सांगू शकतो, विविध कल्पना रंगवू शकतो. त्याची स्वतःच्या विचारांबाबत चांगली स्पष्टता तयार झाली आहे. तो स्वतःच्या शब्दात नीट व्यक्त होऊ शकतो. 

लॉकडाऊनचा खूप मोठा काळ त्याचा बाहेरच्या जगाशी काहीच संपर्क नव्हता. मात्र पुस्तकांच्या माध्यमातून त्याला आम्ही बाहेरचं जग दाखवू शकलो. इतर ठिकाणच्या संस्कृती, वेगवेगळ्या जीवनशैली आणि त्याच्या आवाक्या बाहेरच्या गोष्टींबाबत त्याची चांगली समज बनू लागली आहे. पुस्तक वाचनामुळे किकूची बैठक (attention span) छान वाढली आहे. सध्या आम्ही त्याच्या बरोबर ९-१० वर्ष वयाच्या मुलांचीही पुस्तकं वाचतो. मात्र पुस्तक कितीही मोठं असलं तरी किकू ते वाचून पूर्ण होईपर्यंत तिथून उठत नाही. वाचताना मधून मधून आमच्या हावभावांकडे बघतो. चांगलं प्रकट वाचन कसं असतं हे त्याला नीट समजू लागलं आहे.” शालिनी पुढे म्हणाली की, सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना भरपूर पुस्तकं वाचून दाखवायला हवी. पुस्तकांच्या निवडीबाबत जागरुक असणं चांगलंच आहे, पण ते शक्य नसेल तर लहान मुलांची जी मिळतील ती पुस्तकं वाचावी. वाचताना आवाजातले चढ उतार, आरोह अवरोह यांचा वापर केला, पुस्तकातल्या चित्रांवर आणि गोष्टींवर गप्पा मारल्या तर मुलं अजून रमतात हे सांगतानाच, पालकांनीही स्वतःसाठी काहीतरी वाचायलाच हवं हे तिने आवर्जून सांगितलं.

किकूच्या आवडीची पुस्तकं 

पुस्तक  लेखक  प्रकाशक 
काकूचे बाळ  माधुरी पुरंदरे  ज्योत्स्ना प्रकाशन 
हॅत्तेच्या  माधुरी पुरंदरे  ज्योत्स्ना प्रकाशन
काका  माधुरी पुरंदरे  ज्योत्स्ना प्रकाशन
किती काम केलं  माधुरी पुरंदरे  ज्योत्स्ना प्रकाशन
Just one more swim  Caroline Pitcher & Jenny Jones Parragon
Satya, Watch Out Yamini Vijayan Pratham
अट्टू गट्टू   निलेश निमकर  क्वेस्ट 
ऊ टू ची गोष्ट  निलेश निमकर  एकलव्य 
बी लावलं  निलेश निमकर  एकलव्य 
हट्टी वासरू  निलेश निमकर  क्वेस्ट 
चिऊताई आणि सुरवंट  अच्चा बच्चा कम्युनिकेशन 
चिकूपिकू मासिक  चिकूपिकू 

शालिनी नारनवरे – क्वेस्ट या संस्थेत सिनियर अकॅडेमिक ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. 
राजेश रजक – सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, पर्यावरण, कला या गोष्टींबद्दल त्यांना प्रचंड जिव्हाळा आणि आस्था आहे.

संपर्क:  इ मेल – shalini.narnaware@quest.org.inमोबाईल – 73504 43002

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *