शब्दांकन: मुक्ता नावरेकर
४ वर्षांच्या अनाहिताला तिच्या आई बाबानी आकाशातलं सुंदर इंद्रधनुष्य दाखवलं. ते पाहताच अनाहिताने इंद्रधनुष्याकडे बघत बघत ‘श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे’ ही कविता सहजतेने म्हणायला सुरुवात केली! प्रसंगाला अनुसरून ही कविता त्या चिमुरडीला आठवली आणि कवितेला समोरच्या दृश्याबरोबर ती जुळवू शकली! तिच्या आईच्या, मुक्ता गुंडीच्या भाषेतच सांगायचं झालं तर “ही कविता तिच्यात मुरली होती, कवितेची भाषा तिला आपलीशी वाटू लागली होती.”
अनाहिता ही सागर आणि मुक्ता यांची पावणे पाच वर्षांची मुलगी. तिच्या वाचन-प्रवासाविषयी मुक्ता उत्साहाने आणि भरभरून बोलत होती. अनाहिता ८-९ महिन्यांची असताना त्यांनी तिला पहिल्यांदा चित्रं दाखवून गोष्ट सांगायला सुरुवात केली. मुक्ता सांगते की या काळात अनाहितामध्ये ‘नाही’ म्हणण्याची क्षमता छान विकसित झाली होती. काही खाऊ घालताना ती या ‘नाही’चा पुरेपूर वापर करत असे. तेव्हा त्या दोघांनाही नाईलाजाने तिला मोबाईल दाखवून, रमवून तिचं खाणं उरकण्याची अतोनात इच्छा होत होती. मात्र त्यांनी तिला दाखवली ती चित्रं! चित्रांवरून गोष्ट सांगत, कल्पना रंगवत ते तिच्याशी गप्पा मारू लागलो. अनाहिता या गोष्टीला छान प्रतिसाद देऊ लागली. चित्रांमध्ये गुंतून राहू लागली. त्यानंतर त्यांनी तिला ‘Touch & Play पुस्तकं’ दिली. ही जाड कार्डबोर्डची पुस्तकं असतात. त्यात कागदाच्या विविध प्रकारच्या textures चा (पोत) अनुभव मुलांना घेता येतो. स्वतःच्या बालपणीची शंभरएक पुस्तकं मुक्ताने जपून ठेवली होती. त्यात नेहरू बाल पुस्तकलायची देखील पुस्तके आहेत. तीही अनाहिताला वाचून दाखवायला सुरुवात केली.
मुक्ता आणि सागर महाराष्ट्राबाहेर राहतात. त्यामुळे अनाहिताला मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषा यायलाच हव्यात अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे अनाहिताच्या पुस्तकांमध्ये या सगळ्या भाषांच्या पुस्तकांचा समावेष आहे. तिला घेऊन पुस्तकांच्या दुकानात जाणं, तिथे तिला मनसोक्त पुस्तकं बघू देणं, निवडू देणं हा त्यांचं नित्याचा कार्यक्रम असतो.
भाषांप्रमाणेच साहित्यप्रकारातही विविधता असावी असा त्यांचा प्रयत्न असतो. माधुरी पुरंदरेंचं, एकही शब्द नसलेलं चित्र वाचनाचं पुस्तक, शांता शेळके, विंदा करंदीकर यांच्या कविता, आणि माधुरी पैंच्या Vayu the wind सारखं, अमूर्त संकल्पना सोप्या करून सांगणारं पुस्तक, जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख होईल अशी पुस्तकं असं प्रचंड वैविध्य अनाहिताच्या पुस्तकांमध्ये आहे. मुक्ता म्हणते की पारंपरिक बालसाहित्य तर सुंदर आहेच. पण काही वर्षांपासून त्यात एक नवी विचारधारा देखील येऊ लागली आहे. पठडीच्या बाहेर जाऊन पुस्तकांची निर्मिती होऊ लागली आहे. अशी पुस्तकं आम्ही प्रयत्नपूर्वक आणतो. आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा अर्थ लावून त्याविषयी आपलं मत बनण्याची (social construction) अनाहिताची प्रक्रिया आम्ही पाहतोय. यातही पुस्तकं महत्वाची भूमिका बजावतात. अनाहिताच्या शाळेत एकदा ईद विषयी माहिती सांगत होते. तेव्हा ती म्हणाली, “ईद म्हणजे अल्लाबाप्पाचा वाढदिवस का?” कोणताच पूर्वग्रह मनात न आणता, कोणतंही धार्मिक लेबल न लावता तिला ईदविषयी सांगणं हे आमच्यासाठी आव्हान होतं. योगायोगाने आम्ही एका पुस्तकांच्या दुकानात गेलो आणि आम्हाला ‘इस्मत की ईद’ हे फौजिया गिलानी विल्यम्स यांचं ऊर्दू मिश्रित हिंदी भाषेतलं पुस्तक मिळालं. हे पुस्तक फार रंजक आहे. यातून ईदची तिची स्वतःची समज बनायला देखील मदत झाली आणि उर्दू शब्दांची तोंडओळखही झाली.
पुस्तकांमुळे अनाहिताच्या जडणघडणीत नेमकी काय मदत झाली असं विचारल्यावर मुक्ता म्हणाली की एखादी गोष्ट appreciate करणं, वास्तवाच्या पलीकडे जाऊन प्रतिमा निर्मिती करणं, योग्य ठिकाणी योग्य शब्दांचा वापर करणं या सगळ्या गोष्टींमध्ये पुस्तकांची खूप मोठी भूमिका आहे. एखादं दृश्य बघून अनाहिता तिने वाचलेल्या पुस्तकातलं एखादं अलंकारिक वाक्य पटकन म्हणते. जणू काही ते वाक्य आपलंच आहे इतकी सहजता तिच्या बोलण्यात दिसते. ती भाषा तिने पूर्ण आत्मसात केली आहे हे जाणवतं. बोलण्यातले मर्मविनोद, शब्दांचे खेळ तिला पटकन समजतात. आणि ती त्याचा आनंद घेऊ शकते. ३ ते ५ वर्षं वयात कवितांमधले शब्द, त्यांची लय, त्यातले विविध रस यांचा आस्वाद घेण्याची क्षमता विकसित झाली की ती आयुष्यभर पुरते! वाचनामुळे अनाहिताचा एक वेगळा आत्मविश्वास तयार झाला. तिने एक दिवस सारख्या आकाराचे कागद घेऊन त्यावर तिला येणारी अक्षरं लिहिली, त्याखाली चित्रं काढली. आणि मुक्ताला म्हणाली “हे पुस्तक मी लिहिलं आहे. यावर माझं नाव लिही”!
मुक्ता आणि सागर दोघेही पूर्ण वेळ काम करतात. त्यामुळे कधीकधी अनाहिताला पुस्तकं वाचून दाखवण्यासाठी वेळ कमी मिळतो. अशा वेळी अनाहिता ऑडिओ गोष्टी ऐकते. दिवस कितीही धावपळीचा असला तरी रात्री झोपण्यापूर्वीचा ठराविक वेळ मात्र हे तिघे स्वतःच्या वाचनासाठी देतात. या वेळात तिघे जण आपल्या आवडीची पुस्तकं घेऊन निवांत जागी बसून/ लोळून पुस्तकं वाचतात. जी ‘वाचन संस्कृती’ घरोघरी रुजली पाहिजे असं सतत म्हटलं जातं, ती हीच नव्हे का?
अनाहिताच्या आवडीची पुस्तकं
पुस्तक | लेखक | प्रकाशक |
वेडा वेडा खातो पेढा | शांता शेळके | ज्ञानेश प्रकाशन |
चित्रवाचन (आणि माधुरी पुरंदरेंची इतर सर्व पुस्तकं) | माधुरी पुरंदरे | ज्योत्स्ना प्रकाशन |
इस्मत की ईद | फौजिया गिलानी विल्यम्स | तुलिका प्रकाशन |
वायू द विंड, Maths in the Mela, Scratch scratch scratch | प्रथम बुक्स | |
बाजाराला चला, फुगा आणि इंद्रधनुष्य | नेहरू बाल पुस्तकालय | |
बोबक बकरा | मनरो लीफ | कजा कजा मरू प्रकाशन |
कानामात्रा, आभाळाचा फळा | नीलिमा गुंडी | स्नेहवर्धन प्रकाशन |
मुक्ता गुंडी- अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, बंगलोर इथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.
सागर अत्रे – इंटेलकॅप ऍडव्हायझरी सर्व्हिसेस इथे सिनियर असोसिएट आहेत.
संपर्क: mukta.gundi@gmail.com