शब्दांकन – रश्मी मुसळे-साळगावकर 

आपलं मूल चुणचुणीत, हुशार आणि उत्साही असावं असं प्रत्येक पालकाला नेहमी वाटतं. हे सगळे गुण मुलांमधे एका रात्रीत आपोआप येतील असं तर नाही ना. झाडाची फळं  गोड आणि पौष्टिक असावी याकरिता आपण त्याला खतपाणी घालतो, त्याचं काळजीपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक संगोपन करतो.  त्यासाठी सगळ्यात म्हत्त्वाचं म्हणजे खत कोणतं असावं, ते कधी व किती प्रमाणात त्या रोपाला घालावं आणि ते त्या रोपासाठी योग्य आहे की नाही याविषयी मुळात नीट माहिती असणं आवश्यक आहे. आणि जर तसं नसेल तर ती माहिती योग्य स्त्रोतांकडून मिळवण्याची तयारीदेखील असायला हवी. अगदी हाच नियम हाडामांसाच्या माणसांना घडवतानाही लागू पडतो. एकदा तुमच्या मनाने निश्चय केला की, जे जे काही चांगल आहे ते मला माझ्या पाल्याला द्यायचं आहे की, त्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक विशेष प्रयत्नदेखील घेता आणि या प्रयत्नांना योग्य दिशाही देता. अगदी हेच केल आहे शैलजा तिवले यांनी.

शैलजा यांचं आपल्या मातृभाषेवर म्हणजेच मराठीवर खूप प्रेम. शिवाय पेशाने त्या पत्रकार असल्याने हे प्रेम अधिकच दृढ. पण काही कारणास्तव आपल्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवण्याच्या आपल्या इच्छेला मात्र त्यांना मुरड घालावी लागली आणि सोहमला – त्यांच्या मुलाला त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं लागलं. पण तरीही शैलजांनी मनाशी ठरवलं की, सोहमला मराठी भाषेची गोडी लावायचीच आणि त्यासाठी त्यांनी आधार घेतला तो मराठी भाषेतील बालसाहित्याचा.

आपण मोठी माणसं बऱ्याचदा असा विचार करतो की, ज्या लहान मुलांना अजून वाचता-लिहीताही येत नाही त्यांना पुस्तकं नुसती दाखवून किंवा वाचून दाखवून काय उपयोग, त्यांना कुठे काय कळतं ? पण खरं तर अक्षरं जरी वाचता येत नसली तरी मुलं चित्रांच्या मदतीने पुस्तकंसमजून घेतात.

त्यामुळेच सोहम अगदी १ वर्षाचा होता तेव्हापासूनच शैलजाने त्याला मराठी बडबडगीतांची पुस्तकं आणली आणि त्यातली चित्र दाखवत दाखवत ती बडबडगीतं त्याला गाऊन दाखवायला सुरूवात केली. हळूहळ सोहम त्या गीतांमधली चित्रेही ओळखू लागला. काही महिन्यांनी शैलजाने सोहमसाठी मोठ्या आकारातली भरपूर चित्रे असलेली आणि अतिशय कमी मजकूर असलेली पुस्तकं आणायला सुरूवात केली. यावेळी मात्र त्यांनी मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतली पुस्तकं आणली. त्यांचं वाचन त्या सोहमसमोर करू लागल्या. या मेहनतीची फळं दिसायला सुरूवात झाली होती. पुढे तो जेव्हा २ वर्षांचा झाला तेव्हा तर त्याची कितीतरी बडबडगीते तोंडपाठ झालेली होती. त्याच्यामधे बालगीतांविषयी आवड निर्माण झाली होती. सोहम आगदी लहान असतानापासून Literate behaviour म्हणजेच साक्षर लोकांसारखं वागू लागला. सकाळी सकाळी त्याच्या बाबा बरोबर म्हणजेच विजय यांच्या बरोबर तो वर्तमान पत्रातली चित्रं बघत बसे. Literate behaviour हा वाचन-लेखनाच्या प्रवासातला सुरुवातीचा आणि महत्वाचा टप्पा मानला जातो.    

पुस्तकवाचनाने सोहमची स्मरणशक्ती व कल्पनाशक्ती चांगल्याप्रकारे विकसित होऊ लागली. ‘यश’ च्या पुस्तकांच्या मालिकेतल्या ‘हात मोडला’ हे पुस्तक तर त्याला अगदी तोंडपाठ झालं. हळूहळू सोहम पुस्तकांतल्या गोष्टी व वास्तव यांची एकमेकांशी सांगड घालू लागला व याचा त्याची एक व्यक्ती म्हणून विकास व्हायला नक्कीच मदत होऊ लागली. याचंच एक उदाहरण सांगताना शैलजा सोहमची एक आठवण आवर्जून सांगतात, ती म्हणजे, सोहम अनेकदा त्यांना म्हणायचा, “आई,त्या Henry The Horse मधला घोडा जसा सगळ्यांना मदत करतो तसाच मी पण तुला मदत करणार”.

गोष्टींमधल्या चित्रांतल्या विविध तपशीलांबाबतचं त्याचं निरीक्षण वाढू लागलं होतं…त्यातल्या अनेक अपरिचित गोष्टींबद्दल त्याच्या मनात जिज्ञासा उत्पन्न होऊ लागली. मुलांच्या मनात कुतूहल जागं झालं की त्यांची शिकण्याची प्रक्रिया अधिक सकस व सहज होते. लॉकडाऊनच्या काळात शैलजाने सोहमला प्रयत्नपूर्वक मराठी भाषा लिहायला व वाचायला शिकवली. स्वर आणि व्यंजनांची ओळख करून देताना शैलजाला तिचा शिक्षणक्षेत्रातल्या एका नावाजलेल्या संस्थेमधला अनुभव कामी आला. मुलांना अक्षरओळख व स्वरांची ओळख कशी करून द्यावी याचं तंत्र शैलजाला शिकायला मिळालं होतं. या सगळ्याचा फायदा असा झाला की, सोहम मराठी आणि हिंदी दोन्ही अगदी लीलया लिहायला-वाचायला शिकला.

सोहमचा हा सगळा वाचनप्रवास लक्षात घेऊन शैलजा एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितात. आजच्या काळातील पालक नेहमी आपल्या मुलांबाबत एक तक्रार करताना दिसतात की, आमचं मूल अजिबात वाचन करत नाही. अवांतर वाचन तर सोडूनच द्या, पण अभ्यासाची पुस्तकंदेखील वाचत नाही. यावर शैलजांचं म्हणणं आहे की, वाचन कोणावरही लादता येत नाही. वाचनाची आवड त्या व्यक्तीमधे जाणीवपूर्वक निर्माण करावी लागते. त्यासाठी नियमितपणे काही गोष्टी घडवून आणाव्या लागतात. एक सजग पालक म्हणून मुलाच्या बालपणापासूनच प्रयत्न केले तर असं वाचन समृद्ध वातावरण आपल्या घरी नक्कीच निर्माण करता येतं.

सोहमच्या आवडीची पुस्तकं 

पुस्तक  लेखक  प्रकाशक
यश – ५ पुस्तकांची मालिका माधुरी पुरंदरे  ज्योत्स्ना प्रकाशन
राधाचं घर – ६ पुस्तकांची मालिका माधुरी पुरंदरे ज्योत्स्ना प्रकाशन
Henry – The Horse Lively Liquors  Hinkler Books

शैलजा या लोकसत्ता वृत्तपत्रात पत्रकार आहेत तर विजय हे डॉक्टर आहेत. 

संपर्क: shailja486@gmail.com

One Thought on “सोहम”

  • खुप भारी या पद्धतीने मुलांना शिक्षण खर च मस्त मला खुप आवडले. मी कधीच पाहिले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *