बिलीफ (Better Education Lifestyle and Environment Foundation) ही ‘ना नफा’ तत्वावर चालणारी संस्था आम्ही मागच्या वर्षी सरु केली. आमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या असंख्य प्रश्नांमुळे आम्ही नेहमी अस्वस्थ व्हायचो. “आपण काहीतरी करायला हवं” हा विचार प्रबळ बनत होता. बऱ्याच वैचारिक चर्चा आणि नियोजन करून मे २०१८ मध्ये आम्ही बिलीफची नोंदणी केली. आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण हे बिलीफच्या कामाचे मुख्य विषय आहेत.
सध्या आम्ही पुण्यात बालशिक्षणावर काम करत आहोत. ‘३ ते ६ वयोगटातील मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक इ पातळयांवर विकास कसा होतो? त्याला पुरक असे त्या वयासाठी शिक्षण कसे असायला हवे?’ यावर आमची शिक्षणसाथींची टीम अभ्यास आणि काम करत आहे. पायलट म्हणून ५ अंगणवाडयांमध्ये आम्ही काम सुरु केलं आहे.
नुकताच या शिक्षणसाथींनी प्रशिक्षणाचा एक महिन्याचा पहिला टप्पा पुर्ण केला. यात त्यांनी भाषेची शिक्षणातली भुमिका बहुभाषिक वर्ग कसे हाताळावे, अंकुरती साक्षरता, सहभागी वाचन, चित्र वाचन, मुक्त खेळ, पूर्व गणन उपक्रम, हे विषय विविध सत्र, चर्चा, फिल्म, लेख इ माध्यमांतून समजून घेतले. याशिवाय RTE, ऱाष्ट्रीय शिक्षण आराखडा यांचाही अभ्यास केला. कल्पकतेने स्थानिक आणि पर्यावरणीय सामग्री वापरुन मुक्त खेळासाठी साहित्य बनवलं. ३ ते ६ वयोगटातील मुलांसोबत त्यांची प्रॅक्टीस सेशन देखील झाली. नुकतच त्यांनी अंगणवाड्यांमध्ये काम सुरु केलं आहे.
अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतल्या त्यांच्या पुढील प्रवासासाठी मनःपुर्वक शुभेच्छा!