मुलांना मोजता येत नसले तरी दोन गटांमधील कोणत्या गटात वस्तू जास्त आहेत हे सांगता येऊ शकते. कसे ते आज आपण पाहणार आहोत.

साहित्य – ५ पेले ७ चमचे, ४ बश्या ३ कप, ६ पेले ८ वाट्या, ४ काड्या ५ दगड

कृती – मुलाला तुमच्या बाजूला बसवून घ्या. आणि त्याच्यासमोर ५ पेले आणि ७ चमचे ठेऊन विचारा कि, पेले जास्त आहेत का चमचे? मुलाचे उत्तर ऐकून घ्या. त्यांवर चूक बरोबर असे काहीही न म्हणता आपण बघू या हं असे म्हणून पेले आणि चमचे यांची एकास एक संगत लावून दाखवू या. न विसरतां एक पेला एक चमचा असे म्हणत कृती करा आणि मग मुलाला विचारा एक पेला एक चमचा अशी जोडी लावल्यावर काय उरलं? किंवा काय शिल्लक राहिलं? मुलाचे उत्तर ऐकून घ्या आणि योग्य उत्तर दिले कि बरोबर असे म्हणा आणि सांगा कि चमचे उरलेत म्हणजेच चमचे जास्त आहेत. आणि मुलाला म्हणायला सांगा चमचे जास्त आहेत.
परत विचारा काय उरलं? उत्तर ऐकून घेऊन परत सांगा चमचे उरले म्हणजेच चमचे जास्त आहेत. मुलाकडून म्हणून घ्या, चमचे उरले म्हणून चमचे जास्त आहेत.

याचप्रकारे तुम्ही जमलेल्या सर्व जोड्यांतील एकएक जोडी मुलासमोर ठेऊन काम करा. प्रत्येक जोडीतील कोणती वस्तू जास्त आहे याचा मुलाला आधी अंदाज बांधू द्या आणि मग प्रत्यक्ष कृतीतून काय जास्त आहे याचे नेमके उत्तर शोधू द्या. मूल एकास एक संगत लावताना एक कप एक बशी अशा प्रकारे वस्तूचे नाव घेत घेत एकास एक संगत लावत आहे ना याकडे लक्ष द्या. आणि शेवटी काय उरलं? मग काय जास्त आहे? हे विचारायला विसरू नका. मुलाला कोणती वस्तू उरली आणि ती उरली म्हणून ती जास्त आहे हे सांगण्यासाठी मदत करा.

तुमच्या लक्षात आलेच असेल कि गेले काही दिवस आपण एकास एक संगत लावण्याचा जो सराव घेतला त्यातूनच आज मुलाला मोजणी न करता काय जास्त हे सांगता येऊ लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *